बारामती, (पुणे) : पती व मेहुणीच्या खुनाची केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासूचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जावयावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिल्डीग देवळे पॅराडाईज बारामती येथे हि घटना घडली आहे.
विशाल सोपान वत्रे (रा. मसनेरवाडी ता. दौड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सासू संजना रमेश बाराते (वय 54,देवळे पॅराडाईज बारामती ता. बारामती मूळ रा. बाबुर्डी ता.बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विशाल वत्रे याने सासरे रमेश बाराते व मेहुणी यांचा खून केला होता. या खुनात त्याला 8 वर्ष शिक्षा झाली होती. फिर्यादी सासू व त्यांची मुलगी या शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिल्डींग देवळे पॅराडाईज बारामती येथे घरी असताना आरोपी जावई विशाल वत्रे हा राहत्या घरी आला.
दरम्यान, घरी आल्यावर त्याने पत्नीला शिवीगाळ करून दमदाटी करण्यास सुरुवात केली. तर सासू संजना बाराते यांना पती व मेहुणीच्या खुनाची केस मागे घेत नसल्याने त्यांचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीनुसार जावयावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.