पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे नमुने बदलून त्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच वैद्यकीय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिले आहेत. त्याकरिता त्रि-सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
या समितीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये, मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. तसेच, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही समिती २८ मे रोजी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात उपस्थित राहणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या कागदपत्रांसह चौकशी अहवाल समितीच्या शिफारशीसह वैद्यकीय संचालनालयाला पाठवला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठीचा अहवाल मागवला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी होळनूर, अतुल घटकांबळे यांचे निलंबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.