पुणे : पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज होते. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होते. सध्या बागुल हे भाजप नेत्यांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे.
कॉंग्रेसनं रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे, त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केले होते. आपल्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. तेव्हापासून आबा बागुल हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मैदानात उतरले आहेत. मोहोळ यांच्यासमवेत कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचे वलय आहे, तर धंगेकर यांच्याबरोबर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देताना दाखविलेला करिष्मा आहे. मात्र, धंगेकरांच्या उमेदवारीनंतर पुण्यात काँग्रेसचे नाराजीनाट्य सुरु झालं होतं.
आबा बागुल पाचवेळा नगरसेवक
आबा बागुल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पुण्यात 40 वर्षे काम केलेल्या पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना न्याय नसेल, तर न्याय यात्रेचा उपयोग काय, असा सवाल काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला होता. त्यामुळे आबा बागुल यांची नाराजी ही उघड आहे. आबा बागुल हे काँग्रेस पक्षाकडून पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.