लोणी काळभोर, (पुणे) : येथील एंजेल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाला 9 वीतील 15 ते 20 जणांनी वॉशरूममध्ये ओढत नेहून जबर मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. 23) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचे फुटेज मारहाण झालेल्या मुलांच्या पालकांना देण्यास शाळा प्रशासन नकार देत आहे. या अगोदरही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, शाळा प्रशासन वारंवार होणाऱ्या या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एका वर्गशिक्षकाने पालक अतुल शिंदे यांच्या घरी फोन करून सांगितले की, तुम्ही शाळेमध्ये या काम आहे. त्यानुसार अतुल शिंदे हे शाळेत आले असता त्यांना त्यांचा मुलगा रडत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी मुलाला काय झाले? असे विचारले असता त्याने 9 वीत शिकत असलेल्या 15 ते 20 जणांनी वॉशरूममध्ये ओढत नेहून पोटात, हातावर, डोळ्यावर मारहाण केल्याची माहिती दिली.
याबाबत अतुल शिंदे यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यामध्ये पेपर भरण्याच्या अगोदर मुलगा वॉशरूममध्ये जात असताना 15 ते 20 जणांनी त्याला ओढत नेहून मारहाण केल्याचे निदर्शनास आले. या मारहाणीत सदर मुलाचा डोळा सुजला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका कोतवाल यांना शिंदे यांनी मुलाला शाळेतील काही मुलांनी टार्गेट केले असून अधूनमधून त्याला मारतात, असे सांगितले होते. मात्र, प्राचार्या कोतवाल यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
शाळेच्या तक्रारी वाढल्या..
एंजेल हायस्कूल व महाविद्यालय वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मुलांनी फी न भरल्याने एका वर्गात मुलांना कोंडून ठेवण्यात आले होते. या अगोदरही शाळेत हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्वाची आहे. यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, शाळा प्रशासन व येथील शिक्षक तसेच कर्मचारी हे आदेश पाळत नसून यांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचा आरोप पालक करू लागले आहेत.
याबाबत बोलताना पालक अतुल शिंदे म्हणाले, शाळेच्या मुख्याध्यापिका कोतवाल यांना वारंवार मी सांगितले होते. माझ्या मुलाला वरील वर्गातील मुले टार्गेट करून मारतात. जर त्या मुलांना वार्निंग किंवा समज दिली असती, तर आज ही घटना घडली नसती. मारहाण केलेल्या मुलांवर योग्य कारवाई करावी, असं देखील शिंदे यांनी म्हटले आहे.