सागर जगदाळे / भिगवण : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 6 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार 24 नोव्हेंबर 2023 ते 18 एप्रिल 2024 या काळात घडला आहे. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश बबन माने (वय 53 वर्ष,रा. अकोले, ता. इंदापुर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. मुरशद अली (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाचे श्री महागणपती आयुर्वेदिक महाविदयालय धारवाड कर्नाटक येथे बी. ए. एम. एस. साठी प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. तुम्ही मला मुलाचे शिक्षणाचे प्रमाणपत्र व कागदपत्र द्या असे म्हणत कौन्सिलिंग म्हणून फिर्यादीकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपी डॉक्टरने वेळोवेळी एकुण 6 लाख 67 हजार रूपये ऑनलाईन घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील हे करीत आहे.