शिरूर : गरम पाणी भाजल्याने एका दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे नुकतीच घडली आहे. ऋतिका राहुल उमाप (वय -१.६ वर्ष, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. अनिता उमाप या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते. यावेळी ऋतिका या दीड वर्षीय बालिकेने गरम पाण्याचे भांडे ओढून अंगावर घेतले. ऋतिका गरम पाण्याने मोठ्या प्रमाणात भाजली गेली.
त्यानंतर तिच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिला घरी नेण्यात आले. मात्र, अचानक ऋतिका बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी पुन्हा शिक्रापूर येथे आणण्यात आले. तेव्हा तिचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी राहुल सुभाष उमाप यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश करपे करीत आहेत.