लोणी काळभोर,(पुणे) : सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाक्याचा मळा परिसरात शनिवारी (ता. 23) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोणी काळभोर परिसरात भंगार गोळा करून विक्री करण्याचे काम करतात. तसेच त्यांची अल्पवयीन मुलगीही भंगार गोळा करण्याचे काम करते. शुक्रवारी (ता.22) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व जण झोपले होते. शनिवारी सकाळी पाहिले असता, अल्पवयीन मुलगी घरात आढळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेही आढळून आली नाही.
त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तात्काळ याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यास कळविली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे व पोलीस अंमलदार तुकाराम येडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेले आहे. तसेच मुलीजवळ 12 हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू आहेत. अशा आशयाची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.