अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. याला सहा वर्षे होतील पण, नागरी सुविधा उपलब्ध करण्यास अपयश आले असतानाच आजी माजी नगरसेवकांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. आता तरी लक्ष केंद्रित करा अशी म्हणायची पाळी वडूज येथील सामान्य नागरिकांवर आली आहे.
सात महिन्यांपूर्वी वडूज नगरीची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांनी मोट बांधली, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. अपक्ष नगरसेवकांना राष्ट्रवादीमय करून नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पद बहाल केले. या गोष्टीला सात महिने झाले आहेत. सत्तेचा रिमोट कॅट्रोल ठेवण्यात आला आहे. पण, विकास कामे ठप्प झाली आहेत. युगपुरुषांची नावे काही भागाला दिली आहेत, तिथे रस्त्यावर चिखल साचला असूनही दुर्लक्ष केले गेले. आता तर आजी माजी नगरसेवकांना घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यू साथीने खाजगी रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे.
एक आठवड्यापुर्वी वडूज नगरीत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी मुरूम टाकण्याचा ठेका दिला.रॉयल्टी चलन भरले.पण, अद्याप ही पेडगाव रस्त्यावरील कर्मवीर नगर मुरमापासून उपेक्षित ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात चिखल साचल्याने ये-जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आजी माजी नगरसेवकांना डेंग्यू झाल्याने सतरा प्रभागातील काही नागरिक हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वडूज नगर पंचायत मुख्यधिकारी रजेवर गेल्याने आता तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न करदाते नागरिकांना पडला होता.
त्यातच भाजपचे प्रचारकच रक्त तपासणी करून डेंग्यू झाला नाही ना? याची लॅब मध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. तर इतर नगरसेवक हे काही ठराविक प्रभागात फिरकतच नाहीत. अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज असली तरी कोण पुढाकार घेणार? या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने वडूज नगरीचा कारभार लवकरच सुधारेल अशी भाबडी आशा अनेकांना वाटत आहे.दरम्यान, भाजपने विरोधी पक्षाची भूमिका मांडून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले पाहिजे अशी मागणी होत आहे.