मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आता विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असून लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, माजी मंत्री सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते.
लोकसभेच्या निवडणुकीत मोठी पीछेहाट झाल्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं टाकली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि. १) जाहीर झालेल्या विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. तसेच मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली गेली आहे.
बीड लोकसभेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी त्यांच्या समर्थकांकडून सतत मागणी केली जात होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे 11 नावांची यादी पाठवण्यात आली होती. राज्यात काही महिन्यांत होणारी विधानसभा निवडणूक आणि राजकीय समीकरणे लक्ष घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. आता पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी यांना संधी
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत