मुंबई : अखेर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली असून 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये चांगल्याप्रकारे कामकाज पहिले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात असून राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी 12च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील. यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असणार आहे. मला पक्षाने अनेक संधी दिली आहे आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार कोणाला अर्ज भरायला सांगितलं जाईल त्याला अर्ज भरावा लागणार आहे.
आजपासून (शनिवार) विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.