शिरूर,ता.२७: शिरूर शहरासह गुजरमळा परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, तब्बल सतरा जणांना चावा घेतल्यामुळे शिरूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शिरूर नगरपरिषदेने मोकाट व उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी अग्रही मागणी होत आहे.

आतापर्यंत शिरूरमधील गुजरमळा कॉलनीतील देवांश पळसकर या सहा वर्षाच्या मुलाचा कुत्र्याने तीन वेळा चावा घेतला आहे. तसेच श्रेयस पोटे, महादेव चव्हाण, शंभूराजे शेलार, वंश वाबळे, ईशा रावडे, संदेश भोंडवे, मयूरेश कदम, आयुष हरिहर त्याचप्रमाणे येथील एक वयस्कर ८० वर्षीय दरेकर आजोबा, गौरव गिरमकर इत्यादींना गुजरमळा कॉलनी परिसरात कुत्र्यांनी चावा घेऊन शिकार बनवले आहे. मात्र, यापैकी अनेक लहानग्यांचा जीव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच बचावासाठी आल्यामुळे वाचला आहे. असे शिरूर नगरपरिषदेच्या स्वच्छता समितीचे माजी सभापती विठ्ठल पवार यांनी सांगितले.

दरम्यान गुजरमळा येथे रविवारी (ता.25) पुन्हा दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा चावा घेतला. त्यामुळे जखमी झालेल्या ईशांतला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यामुळे शिरूरमधील गुजरमळा आणि परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी एकत्र येऊन नगरपरिषद प्रशासनाविरोधी नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे. यावेळी शिरूर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठलराव पवार, सविता वाबळे, संध्या दारोळे, सविता बोरुडे, छाया यादव, धनश्री कदम, नंदा नवले, राजश्री रोकडे, सिंधू पळसकर, पूजा हरिहर, प्रीती बनसोडे, पूजा भोंडवे, सुप्रिया गावडे, रश्मी जगदाळे, नितीन यादव, आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे, सुहास वाबळे इत्यादी मान्यवर महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूर नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर कारवाई करावी. तसेच नगर परिषद एखादा अनुचित प्रकार घडण्याची वाट पाहत आहे का?
-सविता दारोळे (सामाजिक कार्यकर्त्या)
शिरूर शहरातील मोकाट कुत्र्यांचे मागील दोन वर्षांपासून निर्बिजीकरण करण्यात येत आहे. तसेच गुजरमळा कॉलनी परिसरातील लहान मुले व वयस्क व्यक्तीवर हल्ले करणाऱ्या दोन मोकाट कुत्र्यांना पकडण्याचा पालिकेच्या पथकाने वारंवार प्रयत्न केला परंतू, ती दोनही कुत्री सापडली नाहीत. यासंदर्भात मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करून भटक्या व उपद्रवी कुत्र्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
-दत्तात्रय बर्गे (स्वच्छता निरीक्षक-शिरूर नगर परिषद)







