पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिला आयोगाकडे हगवणे कुटुंबातून आधीच तक्रार झाली होती, तेव्हाच कार्यवाही केली असती तर वैष्णवी आज हयात असती, असे सांगत विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता महिला आयोगात अध्यक्षा चाकणकर यांच्याविरोधातच तक्रार दाखल झाली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या निष्काळजीपणावरून सर्वत्र टीका सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याचे भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोनाली गाडे आणि स्नेहल चव्हाण यांच्याविरोधातही भालेराव यांनी तक्रार दाखल केली आहे.

कोण आहेत संगीता भालेराव?
संगीता भालेराव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत
अनेक सामाजिक प्रश्नांवरती त्यांचे काम आहे
महिलांचे प्रश्न, पर्यावरण आदी प्रश्नांवर त्या काम करतात
विविध सामाजिक संघटनांसोबत त्या जोडलेल्या आहेत
दरम्यान संगीता भालेराव यांनी समाज माध्यमांवर चाकणकर यांनी खुर्ची खाली करावी, अशा प्रकारची टीका केली होती. त्यांची टीका चाकणकर यांच्या महिला समर्थकांना टोचल्याने सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांनी संगीता भालेराव यांना फोन करून जाब विचारला. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चाकणकर यांच्या समर्थकांनी माझ्याविरोधात अरेरावीची भाषा वापरली. तसेच महिलांना लज्ज उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलल्या. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले. परंतु कुटुंबाच्या विनंतीवरून मी महिला आयोगात त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मला धमकी दिली, यांच्याविरोधात जर तक्रार दिली नाही तर या मुली अजूनही महिलांना धमक्या देतील. असले प्रकार होऊ नयेत, म्हणून मी तक्रार दाखल केली आहे, असे संगीता भालेराव यांनी सांगितले.







