लोणावळा: लोणावळा येथे गाडी वळवण्याच्या वादातून स्थानिक गटाने केलेल्या क्रूर हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री कार्ला फाट्याजवळ घडली असून या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. कमलेश यांचे दोन मित्र झालेल्या मारहाणीत जखमी झाले आहेत. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२) व प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही रत्नागिरी येथील असून लोणावळा येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. गाडी वळविण्याच्या वादातून स्थानिकांच्या गटाने तिघांना मारहाण केली होती. दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मनोज वरवटकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

निकेश कांबिरे, प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ, गौरव संजय पट्टाधारी यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली ज्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कमलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.








