पुणे, ता. 4 : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे निमित्त करून एका व्यावसायिकाकडून तब्बल 3 कोटी 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर सह्या करून घेणे, कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्पवर जबरदस्तीने कागदपत्रे लिहून घेणे, फ्लॅट बळकावण्याची धमकी देणे आणि जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दरिउस साइरस वाचमेकर (वय 53) वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दरिउस वाचमेकर हे शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायासाठी भांडवलाची गरज असल्याने डिसेंबर 2025 मध्ये मित्राच्या माध्यमातून त्यांची महेश गायकवाड याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला चार लाख रुपये कर्ज देताना पाच लाख रुपये घेतल्याचा स्टॅम्पवर जबरदस्तीने मजकूर लिहून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर वेळोवेळी विविध टप्प्यांत रोख व आरटीजीएसद्वारे पैसे देण्यात आले. मात्र, कर्जफेडीचा तगादा वाढत असतानाच मे 2026 मध्ये खराडीतील न्याती प्लाझा येथे बोलावून बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपये रोख घेतल्याचा आणि 1 कोटी 40 लाख रुपये परत देण्याचा स्टॅम्पवर जबरदस्तीने मजकूर लिहून घेतल्याचा फिर्यादीत दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून आणि मित्राकडून मोठ्या रकमेचे अनेक धनादेशही जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे. याच काळात अमित थोरात यांच्या माध्यमातून आणखी 27 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र प्रकल्प पूर्ण न झाल्याने पैसे परत करता आले नाहीत. त्यानंतर आरोपींनी 13 लाख आणि 27 लाखांच्या बदल्यात तब्बल 3 कोटी 30 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पैसे न दिल्यास अल्पवयीन मुलाकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच मगरपट्टा येथील फ्लॅटचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीच्या नातेवाईकांनाही धमकावून घर रिकामे करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याशिवाय फिर्यादीच्या मित्राकडील फ्लॅटची चावीही जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महेश गायकवाड याच्याविरुद्ध बेकायदेशीर सावकारी, खंडणी, धमकी, जबरदस्तीने कागदपत्रे व धनादेश घेणे, शस्त्राचा धाक दाखवणे आदी गंभीर आरोपांखाली खराडी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.







