यवत, ता. ४ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव धावणाऱ्या एसटी बसला पिकअप वाहन आडवे लावून चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील सहजपूर परिसरात घडली. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. याप्रकरणी पिकअप चालकासह तिघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण पंडित मुंडे (वय ४२) हे अहमदपूर (जि. लातूर) एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. २ जुलै रोजी त्यांची अहमदपूर–पुणे या मार्गावरील एसटी बस (एमएच-१४ एमएच-००५६) वर ड्युटी होती. वाहक राहुल दगडू ओठले यांच्यासह ते प्रवाशांना घेऊन पुण्याकडे येत होते. रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास पुणे–सोलापूर महामार्गावरील सहजपूर गावाच्या हद्दीत म्हेत्रे कंपनीजवळ अचानक एमएच-१२ एसएम-९०९७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी एसटीसमोर आडवी उभी करण्यात आली. त्यामुळे चालकाला बस थांबवावी लागली.

यानंतर पिकअपमधून उतरलेल्या चालकासह अन्य दोघांनी “तुला गाडी नीट चालवता येत नाही का?” असे म्हणत एसटी चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. वाहक राहुल ओठले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी धमकावत तेथून पळ काढला. घटनेनंतर जखमी चालकाने बसमधील प्रवाशांची दुसऱ्या एसटीमधून व्यवस्था केली. त्यानंतर उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणी पिकअप (एमएच-१२ एसएम-९०९७) चालक आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






