नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय हरिदास अंबादास शेखरे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.गुरुवारी सकाळी 10:30 ते 11:00 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, हरिदासने शाळेतील एका विद्यार्थिनीला एक चिठ्ठी दिली होती. या प्रकाराबाबत संबंधित मुलीने वर्गशिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर वर्गशिक्षकांनी ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. शाळा प्रशासनाने हरिदासला कार्यालयात बोलावून त्याची समजूत काढली, तसेच या वर्तनामुळे अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून पालकांना बोलावून घेण्याचे सांगितले.

शाळा व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर हरिदास आपल्या वसतिगृहातील खोलीत निघून गेला. काही वेळाने इतर विद्यार्थी खोलीत पोहोचले असता, त्यांना हरिदास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. विद्यार्थ्यांनी तात्काळ ही माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. वणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
दरम्यान, हरिदासच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलाचा मृत्यू सामान्य नसून त्यात घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच आश्रमशाळा प्रशासन आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेखरे कुटुंबाने केली आहे.







