आदित्य बोराटे

कालठण: कालठण नं. १ येथे प्रतिबंधित मांगूर (क्लॅरियस गॅरिपिनस) माशांचे बेकायदेशीर संवर्धन केल्याप्रकरणी विजय संजीवन पाडुळे आणि हनुमंत जाधव (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कालठण नं. १ येथील गट क्रमांक ९८/४ मधील सुमारे १.२० हेक्टर क्षेत्राच्या शेतात राष्ट्रीय हरितलवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगूर (क्लॅरियस गॅरिपिनस) या जातीचे माशांचे मत्स्यसंवर्धन केले जात असल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित प्रकारामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित मांगूर माशांच्या संवर्धनाबाबत मत्स्य विभागाने ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधित माशांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा उल्लेखही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, ३(५), अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ मधील कलम ३, ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार बोराडे (ब. नं. २१४०) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही स.फौज.प्रकाश माने यांनी केली.






