अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील भीमा नदीकाठच्या शेतातील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस येथील गट क्रमांक १५१ मधील भैरवनाथ अॅडिशनल ६३.२२ केव्ही वीज ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडून अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर उघडून त्यातील सुमारे ४० किलो वजनाच्या तांब्याच्या कॉइल चोरून नेल्या आहेत. चोरी झालेल्या कॉइलची किंमत अंदाजे २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १ जुलै रोजी सायंकाळी ४ ते २ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी रामेश्वर दिगंबर चव्हाण (वय ५०, रा. शिक्रापूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेनुसार तसेच भारतीय विद्युत अधिनियमाअंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.






