पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असली, तरी २५ जुलैपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथा परिसरात अद्यापही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धोका कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यातील तीन भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर सात भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण विभागातील रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून तेथे ऑरेंज अलर्ट लागू आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, नाशिकच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी कोकण आणि घाटमाथा परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि डोंगराळ भागातील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.






