पुणे: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून त्याने रौद्र रूप धारण केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपूर्ण देशात पावसाचे संकट गडद झाले आहे. समुद्रातील हवेचा दाब कमी झाल्यामुळे निर्माण झालेली ही सिस्टीम अधिक शक्तिशाली होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणून पुढील 4 ते 5 दिवस देशाच्या विविध भागांत मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

महाराष्ट्रावर या हवामान बदलाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्र एकत्र आल्याने कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘अतिमुसळधार’ पावसाचा इशारा दिला आहे. या पट्ट्यात वाऱ्यांचा वेग 60 ते 70 किमी प्रति तास असू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरचे घाटमाथे, तर विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि गोंदियामध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






