पिंपरी : महापालिकेकडून भोसरी, चिंचवड आणि पिंपरीत घरोघरी नळ कनेक्शन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये तीन महिन्यांत सुमारे ९५०० नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचं आढळून आलं आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात बोगस नळ कनेक्शनधारकांची शोधमोहीम सुरू आहे. महापालिका हद्दीतील आठही प्रभागांत घरोघरी प्रत्येक नळ कनेक्शनची पाहणी करण्यात येत आहे. नळ कनेक्शन अनधिकृत असेल नळजोडणी अधिकृत केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीवापराचे प्रमाण कमी होऊन बिल अचूक होण्यास मदत होणार आहे.शहरात दररोज ६३० एमएलडी पाण्याचा पुरवठा करूनही अपुरा व कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेकडून घरोघरी नळ कनेक्शन सर्वेक्षण सुरू आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणात नळजोडणी अनधिकृत आढळून आल्यास ती अधिकृत करून मीटर बसवण्यात येत आहे. मीटरसाठी ईएमआयची सोय उपलब्ध केली आहे. खराब मीटर बदलण्यात येत आहेत.