पुणे : तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद राहणार आहे. हे मंदिर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि ८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण असल्यामुळे या दोन दिवस मंदिर दर्शनासाठी १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. तर २४ ऑक्टोबरला दिवाळी असल्याने यावेळी सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी भाविकांना कुठल्याही प्रकारचे दर्शन घेता येणार नाही. अशी माहिती मंदिराच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.
२५ ऑक्टोबरला ‘सूर्यग्रहण’असल्यामुळे पहाडी मंदिराचे दरवाजे सकाळी ८.११ ते संध्याकाळी ७ .३० पर्यंत बंद ठेवण्यात येतील. नंतर, भाविकांना प्रार्थना करण्यास परवानगी दिली जाणार आहे. तर पुन्हा ८ नोव्हेंबर रोजी ‘चंद्रग्रहणा’मुळे प्राचीन मंदिराचे दरवाजे सकाळी ८. ४० ते संध्याकाळी ७. २० पर्यंत बंद राहणार आहे. या दोन दिवसाच्या ग्रहण काळात मिरवणूक किंवा देवताना ‘कल्याणोत्सवा’सह अन्य कोणतेही विधी केले जाणार नसल्याचे देखील मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही काळात प्रसंगी देशातील अनेक प्रमुख मंदिरांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे समजत आहे. जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचाही यामध्ये समावेश आहे. ग्रहणाचा कालावधी असेपर्यंत मंदिरे बंद राहतील आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा वेदमंत्राने दरवाजे पुन्हा उघडले जातील. अशी माहिती मंदिर अधिकाऱ्यांनी दिली आहे.