पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकासाठी महापालिका ॲक्शन मोडवर आली असून स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र दोन समित्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या फुले स्मारकाच्या कामाला आता वेग येणार आहे.या स्मारकाचे एकत्रीकरण आणि विस्तारीकरण याचा विषय तातडीने मार्गी लागावा, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून उपयुक्ताच्या अध्यक्षतेखाली महापालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र दोन समित्यांची नियुक्ती केली आहे. या समित्यांना विहीत कालमर्यादेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असले, तरी त्याची कालमर्यादा निश्चित केलेली नाही.
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे विस्तारीकरण करण्यासाठी सुमारे ५ हजार ३१० चौरस मीटर, तर रस्त्यासाठी २९८ चौरस मीटर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. भूसंपादन करताना येथे अनेक जुनी घरे असून, त्यात जुने भाडेकरू राहत असल्याने जागा ताब्यात घेताना जागामालक आणि भाडेकरू यांनाही भूसंपादनाचा मोबदला द्यावा लागणार आहे. हा मोबदला कसा दिला जाणार, यावरून स्थानिक नागरिकांमध्ये मतभेद असल्याने भूसंपदनामध्ये अडथळे येत आहेत. आता या कामाचा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेकडून समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.