उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीत मुळा-मुठा नदीकाठावरील गावांना जोडण्यासाठी महत्वाचा असणारा कोरेगाव मूळ ते अष्टापूर, बिवरी या पुलाचे काम होणे गरजेचे आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोरेगाव मूळचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश कानकाटे यांनी सांगितले.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रभागातील ५६ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. १९) सरपंच मंगेश कानकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच कानकाटे बोलत होते. यावेळी उपसरपंच वैशाली सावंत, सदस्या अश्विनी कड, लीलावती बोधे, राधिका काकडे, पल्लवी नाझीरकर, मंगल पवार, सदस्य भानुदास जेधे, बापूसो बोधे, सचिन निकाळजे, ग्रामस्थ अमित सावंत, दिलीप शितोळे, अशोक सावंत, आप्पासाहेब कड, मुकिंदा काकडे, नानासाहेब शिंदे, विठ्ठल थोरात, सुरेश भोसले, राजेंद्र शिंदे तसेच इतर अनेक ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच कानकाटे म्हणाले, कोरेगावमूळ येथील एका कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांनी कोरेगावमूळ पुलासाठी प्रयत्न करा, अशी मागणी रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार, आता सरपंचपदाचा कार्यभार स्विकारताच पुलासाठी प्रस्ताव देणार असल्याचे कानकाटे यांनी म्हटले आहे.
भूमिपूजन झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्र. १ विठ्ठल नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे – रक्कम (१० लक्ष)
प्रभाग क्र. २ पुणे-सोलापूर हायवे ते विठ्ठलनगर काँक्रिटीकरण करणे. (५ लक्ष)
प्रभाग क्र. ३ विठ्ठलनगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे. ५ लक्ष (जि. प. निधी)
प्रभाग क्र. ४ सचिन कानकाटे घर ते दीपक शितोळे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे(रक्कम ९ लक्ष)
प्रभाग क्र. ५ पुणे सोलापूर हायवे ते देशमुख वाडा हॉटेल रस्ता काँक्रिटीकरण करणे (रक्कम १० लक्ष )
प्रभाग क्र. ६ गावठाण येथे बंदिस्त भूमिगत गटर करणे. (रक्कम ७ लक्ष) (जि. प. निधी)