-बापू मुळीक
सासवड : “सध्याच्या काळात जगण्याचे प्रश्न बिकट बनले असताना संविधान हाच सामान्य जनतेचा आधार बनला आहे. जात धर्म यावरुन भेदभावाचे राजकारण करु नये, असे सांगणाऱ्या संविधानाची शपथ घेऊन सुद्धा द्वेषाचे राजकारण होताना दिसत आहे. बाहेर होणाऱ्या हिंसेसोबतच घरात होणाऱ्या हिंसेला विरोध केला पाहिजे. आम्ही जगण्याच्या प्रश्नांसाठी आंदोलन करतो, त्यालाही भारतीय संविधानाचा आधार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी जनतेचा आवाज उठला पाहिजे. यासाठी आपण मिळून जनशक्ती एकवटणे हा आपला केवळ हक्क नाही, तर आपले कर्तव्य आहे,” असे मेधाताई पाटकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विवेक युवा मंच आणि संविधान परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथे संविधान परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये मेधाताई पाटकर बोलत होत्या.
सुप्रसिद्ध अभिनेते ओंकार गोवर्धन यांनी या संविधान परिषदेचे उद्घाटन केले. संविधानाच्या प्रतिकात्मक झाडाच्या फांद्यांना संविधानिक मूल्यांची पाने लावून अभिनव पद्धतीने या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कोणतीही माहिती नसणार्या युवकांना संविधानाविषयी विद्वेष पसरवला जातो. आपण संविधानातील अनेक तरतुदींचे फायदे घेतो. पण ते ज्यामुळे मिळाले त्याबद्दल बेफिकीर आणि उदासीन राहतो. संविधानाच्या मूल्यांसाठी मांडणी, निश्चित कृती, संवादीपणा, त्यातून होणारी सामाजिक प्रगती हे महत्वाचे वाटते. या मूल्यांसाठी संविधानाचे आपण कायम ऋणी राहावे, अशी सध्याची सामाजिक परिस्थिती असल्याने मी संविधानाला कडकडीत सलाम करतो.’ या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यानंतर राही श्रुती गणेश यांनी ‘आजच्या काळातील संविधानाची गरज’ याबद्दल सर्वांशी संवाद साधला. ‘आज एकीकडे संविधानाची होळी केली जात असताना दुसरीकडे संविधानाची मंदिरे बांधली जात आहेत. पण ह्या दोन्ही गोष्टी करणारी ती माणसे आहेत, ज्यांना संविधानाच्या मूळ आशयापासून विषय भरकटवायचा आहे. अशा काळात आपण संविधान समजून घेण्यासाठी एकत्र जमलो आहोत, हे एक नवा विश्वास आणि आशा देणारी गोष्ट वाटते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी ‘या देशात सामाजिक न्याय मिळण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संविधान समजून घेण्याची गरज आहे. सध्या संविधानाला बायपास केले जात आहे. एकीकडे संविधांनाचा जयघोष करायचा आणि कारभार मात्र त्याविरुद्ध करायचा असे सध्या दिसत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी त्याग केले त्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संविधान हा मार्ग आहे. तो भारत घडवण्यासाठी संविधानातील हक्कांची लढाई लढावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.
यावेळी विवेकी युवा मंच यांनी विविध गीतांतून व ‘संविधान आणि महिला” या पथनाट्याद्वारे उपस्थितांचे संविधानविषयी प्रबोधन केले, तसेच संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेऊन योग्य उत्तर देणाऱ्यांना संविधानाबद्दल पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी प्रज्ञा यादव, सौरभ रडे, सूरज कुंभार यांनी सूत्र संचालन केले. वैशाली कुंभारकर आणि श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी प्रास्ताविक केले तर मीना शेंडकर यांनी आभार मानले.