पुणे : पुणे येथील फ्लेम विद्यापीठातील माजी सहाय्यक प्राध्यापक शिजींनी मुखर्जी यांना कॅम्पसमध्ये कुत्र्याला खायला देण्यावरून विद्यापीठाने बडतर्फ केले होते. या बडतर्फीनंतर मुखर्जी यांनी रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता या बडतर्फीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिकेवर 7 मे पर्यंत विद्यापीठाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यापीठातील कॅम्पसमध्ये कुत्र्याला खायला देण्यावरून मुखर्जी आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील प्राणी कल्याण समिती यांचा विद्यापीठ प्रशासनाशी वाद झाला. त्यानंतर विद्यापीठाने मुखर्जी यांना पदावरून काढून टाकण्याचे पत्र दिले. नोकरीवरून काढून टाकण्याच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील मिहीर देसाई यांनी युक्तिवाद केलेल्या याचिकेत कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला चौकशी शिवाय काढून टाकता येत नाही असे म्हटले.
दरम्यान या बडतर्फीप्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुखर्जी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. दरम्यान 7 मे रोजी या याचिकेला उत्तर म्हणून विद्यापीठ प्रतिज्ञापत्राद्वारे आपली काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.