पुणे : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. या विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण सध्या सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला आहे. अधिकाऱ्यांना सर्वेक्षणादरम्यान वाट आडवल्यामुळे आंदोलन शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदर विमानतळासाठी चालू असलेल्या ड्रोन सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाटा शेतकऱ्यांनी अडवल्या. जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून शेतकऱ्यांनी या सर्वेला विरोध केला.बैलगाडी अंगावर येण्याचे निमित्त करत पोलिसांनी लाठीहल्ला करून अनेक शेतकऱ्यांना जखमी केले. त्यानंतर शेतकऱ्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू होती. विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान शेतकरी अधिक आक्रमक होत असून शेतकऱ्यांनी प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे.