Bus Conductor CPR :मुंबई: बेस्ट बसमध्ये रविवारी सगळ्यांना हादरवून सोडणारी घटना घडली. प्रवास करत असताना एका ६२ वर्षीय प्रवाशा हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने बेस्टच्या बसवाहकाने केलेल्या प्रथमोपचारामुळे मिहणजेच दिलेल्या सीपीआरने त्याचे प्राण वाचले आहेत. रोहिदास पवार असे या प्रवाशाचे नाव आहे, तर अर्जुन लाड असे त्याचे प्राण वाचवणाऱ्या वाहकाचे नाव आहे. केलेल्या या समाजोपयोगी कामामुळे बेस्टच्या घाटकोपर आगारातर्फे लाड यांचा सत्कार करण्यात आला.
ही घटना घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये रविवारी घडली. रोहिदास पवार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर बसमधील वाहकाने तात्काळ प्रवाशाला छातीवर हाताने पम्पिंग करून प्रथमोपचार केले. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.
घटना कशी घडली
घाटकोपर आगारातील ३४ क्रमांकाची वातानुकूलित बस घाटकोपर आगार ते लोकमान्यनगर (ठाणे) अप दिशेने जात होती. रोड नंबर १६ ठाणे येथे बस आली असता, बसमधील प्रवासी रोहिदास रामचंद्र पवार यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी कर्तव्यावर असलेले बसवाहक अर्जुन लाड यांनी त्यांच्या छातीवर हाताने पम्पिंग करून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. बराच वेळ पम्पिंग केल्यानंतर पवार काहीसे शुद्धीवर आले. यावेळी पवार यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. त्यानंतर पवार यांना तातडीने खासगी वाहनाने पुढील उपचारांसाठी कामगार रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर पुढील उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. पवार यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.