बारामती : सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. यावेळी अनेकजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच देशात चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी केले आहे.
बारामतीमध्ये अजित पवार यांची शनिवारी सभा झाली होती. त्यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर शरसंधान साधले होते. सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण चार जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
या सभेवेळी अजितदादांच्या टीकेला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांना चार जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले. मला माझा मुलगाही प्रिय आहे आणि तितकेच दीरही प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत चर्चेतील आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
बारामती आणि शरद पवार यांच्यातील नातं हे वर्षानुवर्षे अतूट असे समीकरण तयार झालेले आहे. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील मिशनरी बंगल्याच्या मैदानावर सांगता सभा घेत आले आहेत. परंतु यावर्षी मिशन बंगला परिसरातील मैदान अजित पवार यांच्या पक्षाला सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आले असल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेसाठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली आहे.