हडपसर : हडपसर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अधिकृत पथारी व्यवसायिक व्यवसाय करीत आहेत. अधिकृत पथारी व्यावसायिकांनी महापालिकेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. मात्र महापालिकेच्या धोरणामुळे अनाधिकृत व्यावसायिकांमुळे गळचेपी होत आहे. महापालिकेने या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी. व अधिकृत पथारी व्यावसायिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. अशी मागणी हडपसर येथील पथारी व्यावसायिक पंचायतचे अध्यक्ष मोहन चिंचकर यांनी केली आहे.
पुणे सोलापूर मार्गावर पथारी व्यवसायिकांचा रस्त्याला होणारा अडथळा लक्षात घेता महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधिंनी हडपसर उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केले होते. परंतु, उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पुन्हा रस्त्यावर व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडीमुळे उड्डाणपुलाची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा या पथारी व्यवसायिकांना उड्डाणपुलाखाली स्थलांतर करण्यात आले.
सध्या प्रचंड पावसाळा असल्याने उड्डाणपूलातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तसेच या ठिकाणी चिखल झाला असून येथे हागणदारीयुक्त वातावरण निर्माण झाल्याने गोरगरीब पथारी व्यवसायिकांना व्यवसाय करणे धोकादायक बनले आहे. मालाचे नुकसान सोसणे अवघड झाले आहे. त्यातच अधिकृत व्यावसायिक उड्डाणपुलाखाली व्यवसाय करतात व अनाधिकृत व्यवसायिकांनी रस्ते व्यापले असल्याने पुलाखाली व्यवसायच होत नसल्याची खंत पथारी व्यवसायिकांनी बोलताना व्यक्त केली.
हडपसर मध्ये 150 अधिकृत पथारे व्यावसायिक असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. आम्ही कष्टकरी प्रामाणिक व्यवसाय करत असताना आमच्यावरच अन्याय का असा सवाल करून महापालिकेने आम्हाला जगू द्यावे. अन्यथा आम्हाला न्याय मागण्यासाठी आंदोलन करावे लागेल. असा इशारा मोहन चिंचकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी पथारी व्यावसायिक पंचायत हडपसर अध्यक्ष मोहन चिंचकर, कार्याध्यक्ष सुलतान बागवान, उपाध्यक्ष फरीद बागवान, सचिव राजेश साखरे, खजिनदार अनिल अग्रवाल, सदस्य निरंजन घुगे, बापू चिंचकर, हिरा अग्रवाल, गणेश पाणकर, अमोल दळवी, मोनू अग्रवाल, अमोल घोडके, मेहबूब बागवान, संतोष चिंचकर, मालन साळुंके, पुष्पा अग्रवाल, उपस्थित होते.
दरम्यान, हडपसर उड्डाण पुलाखाली व्यवसाय करणे जीकीरीचे बनले असून दिवाळी पुरते आम्हाला रस्त्यावर व्यवसाय करण्यास महापालिकेने परवानगी द्यावी. रस्त्याला कोणताही अडथळा होणार नाही. याची आम्ही दक्षता घेऊ अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायत हडपसर या संघटनेने केली आहे.