पुणे : पुण्यातील एका सात वर्षाच्या चिमुकल्याला कुत्र्याने पंधरा ते वीस फूट फरफटत नेऊन त्याच्या गालाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्याच्या मित्रांनी त्या कुत्र्याला दगड मारल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरेंद्र शेर बहादूर बिस्ता (वय ७) असं गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या ‘चित्तरंजन वाटिका’ या महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी तो आला होता. यावेळी चिमुकल्याने कुत्र्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, पण कुत्र्याने त्याचा लचका तोडला. मुलाच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते रविद्र साळेगावकर यांच्या माध्यमातून आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्याशी संपर्क केला. शिरोळे यांनी दिनानाथ रूग्णालयचे प्रशासक सचिन व्यवहारे यांच्याशी संपर्क करून मुलावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. धर्मादाय योजनेतून डॅा. कौस्तुभ प्रभूणे यांनी प्लास्टिक सर्जरी यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान चिमुरड्याच्या औषध उपचारासाठी उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी जवळपास पंचवीस हजार रूपये वर्गणी गोळा करून दिली.या घटनेतून मुलगा थोडक्यात वाचला असून उद्यानात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.