Film News : मुंबई : बॉलिवूडमधील एक नावाजलेले नाव म्हणजे श्रीदेवी. एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी श्रीदेवी यादेखील होत्या. पण श्रीदेवी यांच्यासोबत सावलीसारख्या असायच्या त्या म्हणजे त्यांच्या बहीण श्रीलता. होय, अगदी सावलीसारख्या त्यांच्यासोबत असायच्या. श्रीदेवी जिथे कुठं जायच्या त्यांच्यासोबत त्यांची बहीण असायचीच.
बहीण महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम
श्रीलता यांनी कधीही अभिनय केला नाही. त्या फिल्मी दुनियेपासून दूरच होत्या. पण श्रीदेवी यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांची बहीण महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम होती. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की त्या दोघीही एकमेकांविरोधात कोर्टात गेल्या.
श्रीदेवी यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. पण जेव्हा श्रीदेवी आणि श्रीलता यांच्या वादाची ठिणगी पडली तेव्हा बोनी कपूर यांनी हे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काय पूर्ववत होऊ शकले नाहीच.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आईच्या मृत्यूनंतर श्रीदेवी आणि श्रीलता या दोन बहिणींमध्ये मतभेद झाले. त्यांची आई ज्या रुग्णालयात दाखल होती तिथे ऑपरेशन झाले. पण हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांच्या आईची स्मरणशक्ती गेली आणि त्यानंतर 1996 मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या श्रीदेवीने हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला.
श्रीदेवी यांनी रुग्णालयाविरुद्धचा खटला जिंकला आणि त्यांना त्यावेळी सुमारे 7.2 कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली होती. या रकमेमुळेच दोघी बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. याच रकमेमुळे निर्माण झालेला वादही कोर्टात गेला. तेव्हापासून या दोघींमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला होता.