लोणी काळभोर: महिलांना सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी महिला पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. महिला सक्षमीकरण हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला पोलिसांमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या पातळीत वाढ होते आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतही मदत होते. त्यामुळे महिला पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन राजेंद्र पन्हाळे यांनी केले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, वैजिनाथ शेलार, प्रशांत कळसकर व महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या समोर फुलांची रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. त्यानंतर महिला पोलिसांच्या बाईक रॅलीची लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली. पुढे बाईक रॅली दत्त मंदिर चौक, खोकलाई माता चौक, शिवाजी महाराज स्मारक, रामदरा रोड, पाषाणकर रोड, घोरपडी वस्ती, इंदिरानगर, सोलापूर महामार्ग, लोणी स्टेशन, एमआयटी कॉलेज, लोणी फाटा ते पुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाणे या मार्गाने काढण्यात आली. बाईक रॅलीच्या वेळी महिला पोलिसांनी ‘मुलगी शिकली, प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ’ या घोषणा दिल्या.
दरम्यान, या रॅलीमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार राणी खामकर, निशा कोंढे, अश्विनी माळी, वैशाली निखंबे, दिपाली पाटोळे, ज्योती नवले, अश्विनी पवार, कोमल आखाडे, लक्ष्मीबाई यादव, वनिता यादव, चंदा माने, शिल्पा हरिहर, योगिता भुसारे, सरिता जाधव, नीलम धांडे, उषा थोरात आदी महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.