मुंबई : इन्फोसिसमध्ये नुकतेच ३००० पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावरुन काढून टाकले होते. याआधी फेसबुक, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला या दिग्गज कंपन्यांनीही नोकर कपातीची घोषणा केली. आता मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओस्टारही टाळेबंदीच्या तयारीत आहे. जिओस्टार १,१०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.
वायकॉम १८ आणि डिस्ने स्टार इंडिया यांचे विलीनीकरण झाले. जिओस्टार आता देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनली आहे. अहवालानुसार, ऑपरेशन मजबूत करणे आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही टाळेबंदी केली जात आहे. रिलायन्स डिस्ने विलीनीकरणाने भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी तयार झाली असून ज्याचे मूल्य ७०,३५२ कोटी रुपये आहे.
वितरण, वित्त, व्यावसायिक आणि कायदेशीर यासह विविध कॉर्पोरेट विभागातील कर्मचाऱ्यांना या नोकर कपातीचा फटका बसू शकतो. यामध्ये प्राथमिक स्तरापासून वरिष्ठ व्यवस्थापक, संचालक आणि अगदी सहाय्यक उपाध्यक्षांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. नुकसान भरपाई पॅकेज कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीनुसार असेल, जे ६ ते १२ महिन्यांच्या पगाराच्या दरम्यान असते.