हवेली (पुणे): हवेली तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर येथे गेल्या काही वर्षांपूर्वी माजी आमदार अशोक पवार यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने मंजूर केले आहे. परंतु, हे कार्यालय जागे अभावी रखडल्याचे दिसत आहे. परंतु, पुढील महिन्याभरात अप्पर तहसील कार्यालय हे लोणी काळभोर येथूनच सुरु होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी दिले.
गेल्या काही दिवसांपासून शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोरचे सामाजिक कार्यकर्ते, लोणी काळभोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय भालेराव, शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे, महेश फलटणकर, विकास काळभोर व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पूर्व हवेलीतील एकूण २० ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते.
या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून ७ मार्च रोजी संजय भालेराव व हनुमंत सुरवसे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर लोणी काळभोर येथे सुरु करावे, यासाठी निवेदन दिले. तसेच कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत चर्चा केली. पुढील महिन्याभरात अप्पर तहसील कार्यालय हे लोणी काळभोर येथूनच सुरु होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी दिले.