पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जनाची धामधूम सुरू असताना भाविकांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरात एफडीएची २० पथके कार्यरत करण्यात आली असून मिठाई, मावा, खवा यासह विविध खाद्यपदार्थांची तपासणी सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाटण्यात येणाऱ्या प्रसादावरही या पथकांची विशेष नजर राहणार आहे.

गुरुवारी दुपारपासून एफडीएची पथके शहरातील विविध भागांत तपासणी करत असून खाद्यपदार्थांचे नमुने घेत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित पद्धतीने होत आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे.

पुणे शहरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २० पथकांमध्ये सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी दोन ते तीन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. शहरातील मिठाईची दुकाने, मिठाई तयार करणारे कारखाने तसेच खाद्यपदार्थांची विक्री होणाऱ्या विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे.

गुरुवारी रात्रीही ही तपासणी मोहीम सुरू होती. शुक्रवारी दिवसभर तपासणी सुरू राहणार असून शनिवारीही कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात किंवा इतर व्यवस्थेत एफडीएची पथके सहभागी नसतील. खाद्यपदार्थ आणि प्रसादाच्या विक्री-वितरणाच्या अनुषंगानेच ही तपासणी केली जात आहे. मिरवणुकीदरम्यान प्रसाद वाटपाच्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर २० पथके तैनात करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिली.






