पुणे : हातात इंजिनीअरिंगची पदवी असतानाही नोकरी सोडून दुचाकी चोरीचा मार्ग निवडलेल्या २७ वर्षीय तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. महादेव शिवाजी गरड (वय २७, मूळ रा. लातूर, सध्या रा. नवले हॉस्पिटलजवळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या तब्बल ११ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या वाहनचोरीच्या घटनांचा तपास करताना वाकड पोलिसांनी परिसरातील १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून पोलिसांना संशयित आरोपीची ओळख पटली.

दरम्यान, संशयित पुन्हा एकदा दुचाकी चोरी करण्यासाठी वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांच्या पथकाने सापळा रचला. १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी महादेव गरड याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने तीन महिन्यांच्या कालावधीत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर वाकड, काळेवाडी, हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या ११ महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनचोरीच्या प्रकरणांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.







