पुणे प्राईम न्यूज डेस्क: खरं तर फौजदार रुपाली जाधव यांची यशकथा म्हणजे अगदी चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. परिस्थितीपुढे संघर्ष केला आणि जिद्द धरली, तर एक महिला आकाशालाही गवसणी घालू शकते याचे प्रेरणादायी प्रतिक म्हणूनही या यशाकडे पाहावे लागेल. ही प्रेरणादायी कथा आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या फौजदार रुपाली राजेंद्र जाधव यांची.

रुपाली यांचा जन्म होटगी (ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) येथील सर्वसामान्य कुटुंबातला. शालेय शिक्षण शासकीय आश्रमशाळा, होटगी गाव येथे झाले. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेतून सन 2015 साली पदवी संपादन केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे सन 2016 मध्ये त्यांचा विवाह झाला. मात्र काही कारणाने त्यांना विभक्त व्हावे लागले आणि हाच त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा आणि दृष्टी देणारा क्षण ठरला. कारण त्यानंतर त्यांच्यावर अनेक आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या आल्या, पण त्या डगमगल्या नाहीत कि परिस्थितीला शरणही गेल्या नाहीत. उलट संकट हीच संधी मानून त्यांनी संकटाला पायाखाली घेतले आणि त्यावरून यशाचे पाऊल सर केले. आपण काहीतरी करून दाखविले पाहिजे, असा निश्चय केला.

म्हटलेच आहे की इच्छा तेथे मार्ग, त्यानुसार त्यांचेही झाले. त्यांनी उपनिरीक्षक होण्याची इच्छा धरली आणि त्यांना मार्गही दिसला. त्यांचे बहिणीचे पती दाजी संदीप गायकवाड हे पोलिस अंमलदार आहेत. त्यांच्या आणि बहिणीच्या प्रोत्साहनातून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले-मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु, रुपाली यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास सुरु केला. त्यासाठी प्रसंगी सोळा सोळा तास अभ्यास केला. लवकरच त्यांची मेहनत फळाला आली आणि 2023 साली त्या पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी उत्तीर्ण झाल्या. पुढे नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. तेथे 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतले. ते यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता त्यांची प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. आणि आता तर जिद्द आणि चिकाटीचे दुसरे रूप म्हटले की त्यांना ओळखणारे त्यांचेच नाव घेतात, फौजदार रूपाली जाधव.

कष्टाची तयारी ठेवा
माझ्या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, मोठी बहीण रेणुका, दाजी संदीप गायकवाड व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करते. कष्ट व संघर्ष करायची तयारी असेल तर यश तुम्हाला नक्की मिळतेच. मग तो संघर्ष कितीही मोठा असो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, अभ्यासात सातत्य ठेवा तुम्ही नक्कीच यश संपादन करू शकता.
-रुपाली जाधव, पोलीस उपनिरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)







