पुणे : एकमेकांकडे बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट दगडफेकीत झाल्याची धक्कादायक घटना कात्रज-गुजरवाडी परिसरातील दत्तनगर येथे घडली आहे. दोन गटांतील तरुणांनी जमाव जमवून एकमेकांवर विटा, दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या राड्यात रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास दत्तनगर परिसरातील मंदिराजवळ हा प्रकार घडला. केवळ एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोन गटांतील तरुणांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारी आणि दगडफेकीत झाले.
दोन्ही गटांतील तरुणांनी जमाव जमवून एकमेकांवर विटा आणि दगड भिरकावले. अचानक सुरू झालेल्या या राड्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरून जाणारे नागरिक आणि स्थानिक रहिवासी या प्रकारामुळे भयभीत झाले. दगडफेकीत रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुमीत केंजळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







