पुणे : आखाती देशातून भारतात होणारा एलपीजी गॅसचा पुरवठा प्रामुख्याने होर्मुज खाडीच्या सागरी मार्गातूनच होतो. त्यामुळे या भागात कोणतीही अशांतता निर्माण झाल्यास भारताची चिंता अधिक वाढते. यापूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना भारतात स्वयंपाकाच्या गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली होती आणि कंपन्यांनी गॅसचे दरही वाढवले होते. आता या मार्गावर पुन्हा एकदा हल्ले सुरू झाल्याने इंधनाचे दर भडकण्याची भीती निर्माण झाली असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर होर्मुज सामुद्रधुनीत पुन्हा तणाव वाढला आहे. पनामा देशाचा ध्वज असलेल्या ‘तारा गॅस’ या एलपीजी वाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे . काही तासांतच तेल आणि गॅस वाहून नेणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या सागरी मार्गावरून भारतीय जहाजांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली जात असतानाच झालेल्या या घटनेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर एकूण 25 कर्मचारी कार्यरत होते, ज्यामध्ये 24 भारतीय नाविकांचा समावेश होता. सुदैवाने या दुर्घटनेत सर्व कर्मचारी सुखरूप असल्याचे समोर आले आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकार या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, संबंधित जहाज कंपनीशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय खलाशांचा जीव आणि त्यांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष अद्याप पूर्णपणे शमलेला नाही. सध्या थेट हल्ले थांबलेले असले तरी दोन्ही देशांमध्ये अद्याप शांतता करार झालेला नाही. अमेरिकेवर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी इराणकडून सागरी मार्गावर असे हल्ले घडवून आणले जात असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता असून, संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.






