केडगाव: पिंपळगाव ते टोलनाका या मार्गावर डांबरीकरणाचे काम पूर्ण उखडले असल्याने कच्च्या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
कोणत्याही मार्गाचे काम उखडल्यास नागरिकांची गैरसोय होते. परंतु, त्यावर काही उपायोजना करून गैरसोय टाळण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. मात्र, या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात प्रयत्नांचा अभाव दिसून येत आहे. सुमारे १५ ते २० किमी अंतराचा रस्ता पुर्ण खड्डेमय झाला आहे. अनेक ठिकाणी 2 ते 3 फुटाचे खड्डे पडले असून त्यावर मुरूम देखील टाकण्यात येत नाही. या खड्डेमय रस्त्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक सुरु असल्याने प्रचंड धूळ हवेत उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी या रस्त्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
रस्त्यावर काही वेळा मुरूम टाकण्यात आला असून या कच्च्या रस्त्यावर ठेकेदाराकडून पाणी देखील मारले जात नाही. केलेली डागडुजी एकच दिवसात जैसे थे अशी होते. त्यामुळे मार्गावर धुळीचे साम्राज्य आहे. ठेकेदाराकडून रस्त्याचे काम करताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. रस्त्यावरील धूळ उडू नये, यासाठी रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे. परंतु, ठेकेदाराकडून अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे. मात्र दिवसरात्र सुरू असलेल्या कामांमुळे व सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे धुळीचे लोट उडण्याचे थांबत नाही.
धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. मार्गावरील धुळीवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी करूनही संबंधित अधिकारी हे ठेकेदाराची पाठराखण करत आहेत. तसेच चालकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पिंपळगाव ते टोलनाका या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ -मोठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी भांडगाव येथील विद्यार्थी बारावीचा पेपर देऊन परतत असताना खड्डा चुकवताना त्याचा अपघात घडला आहे. असे अनेक अपघात झाले आहेत. परंतु, पुढील काळात असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन व ठेकेदार यांनी लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात.
-संजय थोरात – अद्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ