लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन दिवसीय “डायनॅमिक अॅन्युएल फंक्शन- २०२२” या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक महोत्सवाच्या सोहळ्याची सुरुवात सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रेनबो स्कूलचे चेअरमन नितीन काळभोर यांच्या शुभ हस्ते पार पडले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला. फोक डान्स, बॉलीवूड, हिप-हॉप या शैलीतील विविध गाण्यांवर मुलांनी ठेका धरला. मंगळागौर, अभंग, गौळण यासारख्या गाण्यांमधून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडले. देशातील सांस्कृतिक विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता गाण्यांच्या माध्यमातून दाखवली गेली तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
रेनबो स्कूलचे डान्स कोरिओग्राफर कु अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाणी सादर करण्यात आली. यावेळी बाल कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यावेळी रेनबो स्कूलच्या व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, रेनबो किड्स कायझन- द प्री स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर, रामदास काळभोर, प्रथमेश काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रीस्कूल मधील लहानग्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदरपणे वेगवेगळ्या गाण्यांचे सादरीकरण केले. गाण्यानुरूप वापरलेले वेगवेगळे पोशाख, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुरेख नृत्य दिग्दर्शन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली गेली. प्रेक्षक पालक टाळ्यांच्या गजरात या बालकलाकारांना प्रोत्साहित करत होते. प्रीती कदम व सीमा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मूकनाट्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शिवराज साने व प्रियांका जाधव या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध वाद्य वाजवून गीतांचे सादरीकरण केले.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री जगताप, ममता ननवरे, प्रीती कदम व ऋतुजा पाटील यांनी केले. तर रंगभूषा, वेशभुषाचे आयोजन कला शिक्षक दिपक शितोळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. रेनबो स्कूलने महोत्सवाच्या केलेल्या सुंदर आयोजनाचे पालकांनी कौतुक केले.