गुहागर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना गुहागर येथील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गुहागारमध्ये सासऱ्याने सुनेचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या संदर्भात पीडित महिलेने पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तीन दिवस होऊनही अद्याप सासरा मोकाट असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुहागरमधील देवघर येथे सासऱ्याने लैंगिक छळ केल्याची तक्रार सुनेने केली आहे.तर सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेने तक्रार केली आहे.. दरम्यान महिलेच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या आणि रुपाली चाकणकर यांच्या सेक्रेटरी अॅडव्होकेट सायली दळवी यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.सासऱ्याचा दारूचा व्यवसाय असल्याने पोलिसांकडून अटक होण्यास टाळाटाळ होत असल्याचा सायली दळवी यांनी आरोप केला आहे.

दरम्यान गेल्या तीन दिवसापासून अद्यापही सासरा मोकाट असल्याची माहिती समोर आल्याने महिला आयोग आक्रमक झाला आहे.गुहागर पोलिसात सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने भेट दिल्यानंतर सध्या पोलिस स्थानकात महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे.







