पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेत राज्यभरातून २७४ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहेत. अद्याप काही विषयांचे पेपर बाकी असून, गैरप्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची विद्यार्थ्यांमध्ये जागृती नाही, असे चित्र दिसून येत आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार, ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. आतापर्यंत इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, वाणिज्य संघटन, भौतिकशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, रसायनशास्त्र आणि गणित विषयांचे पेपर झाले आहेत. यामध्ये इंग्रजीला ४२, हिंदीला १६, मराठीला ८, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ८, भौतिकशास्त्र ७४, चिटणीसाची कार्यपद्धती २, रसायनशास्त्र ५४ आणि गणित ६६ गैरप्रकारांची नोंद झाली.
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे यंदाच्या बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानुसार यंदाच्या परीक्षेत राज्य शासनाने कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या होत्या. राज्य मंडळाकडून परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांची अदलाबदल, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी, व्हिडीओ चित्रीकरण, भरारी पथकांची नेमणूक अशा विविध मार्गानी गैरप्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, बारावीत पहिल्या पेपरपासून मोठ्या संख्येने गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले.
शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना छुप्या पद्धतीने गैरप्रकार करण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे शासनाच्या उपाययोजनांचा परिणाम दिसून आलेला नाही. परीक्षा केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याने गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार रोखता यावेत, यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहेत.