पुणे : सध्या गुगल पे आणि फोन पे वरून ऑनलाइन पेमेंट करणं नागरिकांच्या चांगलंच अंगवळणी पडलं आहे. अशातच एका तरुणीला ऑनलाइन पेमेंट करण चांगलंच महागात पडलं आहे. वाघोली ते विमाननगर असा रिक्षा प्रवास करणाऱ्या तरुणीने वीस रुपये भाडे गुगल पे द्वारे केले होते. त्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या मोबाईल नंबरवर अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणीने वाघोली ते विमाननगर असा रिक्षा प्रवास केला. तिने रिक्षाचे भाडे गुगल पे द्वारे केल्याने तिचा मोबाईल नंबर त्या रिक्षा चालकाकडे गेला होता.त्यानंतर रिक्षाचालकाने त्याचा फायदा घेऊन तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवले. यानंतर व्हिडिओ कॉल करून अश्लील बोलण्याचा प्रयत्न देखील केला. तरुणीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईल वरून पुन्हा असे प्रकार सुरू केले.
अखेर तिने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.