जीवन सोनावणे
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीने दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय लांडगे याचे विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी पंधरा दिवसाच्या आत जामिनावर सुटल्याने भीती व नैराश्यपोटी दि.१६ रोजी पहाटे चार वाजता राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत तिने आपले जीवन यात्रा संपवली व आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून संबंधित अक्षयला शिक्षा करण्याची मागणी केली आहे .
सावित्रीबाईंची जन्मभूमी असणाऱ्या नायगाव लगतच्याच गावात अत्याचार ग्रस्त युवतीला आपले जीवन संपवत न्यायाची मागणी करावी लागल्याने ग्रामस्थांनी युवतीचे पार्थिव ॲम्बुलन्स मधून पोलीस स्टेशन पुढे आणत पोलिसांच्या कामगिरी विरोधात संताप व्यक्त केला.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि. २९ रोजी सांगवी ता. खंडाळा येथील युवती पंढरपूर फाटा येथील शाळेमध्ये पायी चालत जात असताना दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय याने तिला गाडी आडवी मारत ” तू मला लय आवडते.. हो का नाही ते सांग,” असे विचारत असताना युवतीने याबाबत “घरी सांगेन” असे म्हणताच त्याने तिचा उजवा हात वाईट हेतूने पकडून मनात लज्जा होईल असे वर्तन केले .
आई-वडिलांना सोबत घेऊन शिरवळ पोलीस स्टेशनला जाऊन युवकाविरोधात विनयभंग व पॉक्सोसहित विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता .विनयभंग व पॉक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल असूनही पंधरा दिवसाच्या कालावधीतच आरोपीला जामीन झाला होता. एवढे होऊनही दि. ३० रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास विकास भानुदास चव्हाण व निखिल यलप्पा चव्हाण , राहणार दत्तनगर यांनी अक्षय लांडगे वर केस केले चे रागातून तक्रारदार युवतीस शिवीगाळ करीत मुलीचे अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला . मुलीच्या आईचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून केस मागे घेतली नाही तर मुलीला उचलून नेईन असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली .या घटनेची तक्रार अत्याचार ग्रस्त युवतीच्या आईने शिरवळ पोलिसात दिली आहे.
सदर गुन्ह्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू असतानाच आरोपी केवळ पंधरा दिवसातच जामीनवर सुटून बाहेर आला व गेली दोन ते तीन दिवसापासून तो मित्रांसह मुलीच्या घराबाहेर मोटरसायकलवर घिरट्या घालत असल्याने सदर मुली सह तिचे संपूर्ण कुटुंबच दबावात आले असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे . त्यामुळे भीती व नैराश्यपोटी सदर अत्याचार ग्रस्त युवतीने राहत्या घरी पहाटेच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी उठल्यावर युवतीच्या आईस मुलीने साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले . अखेर पोलिसांनी आरोपी अक्षय यास ताब्यात घेतले असून कारवाई चालू असल्याची ग्वाही देत नातेवाईकांना युवतीचा अंतिम संस्कार करण्याची विनंती केली . सांगवी येथे शोकाकुल वातावरणात युवतीचा अंतिम संस्कार विधी करण्यात आला .
मुलीच्या आई-वडिलांचा आक्रोश पिळवटून टाकणारा
युवतीचा मृतदेह शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची उत्तरिय तपासणी केली आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला . युवतीच्या नातेवाईकांनी मृतदेह शिरवळ पोलीस स्टेशनला आणून जोपर्यंत आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करीत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने व सांगवी ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन समोर जमल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. विनयभंग व पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊ नये थोड्या दिवसात आरोपींची सुटका झाल्याने तसेच आरोपीचे मित्र वारंवार युवतीच्या कुटुंबीयांना केस मागे घेण्यासाठी धमक्या देत असल्याने नातेवाईकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत संताप व्यक्त केला.मुलीच्या आई-वडिलांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता .
अक्षयला शिक्षा करा हीच शेवटची इच्छा!
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्टी सापडली असून त्यामध्ये कुटुंबीयांची माफी मागत ” अक्षयला शिक्षा करा ” हीच शेवटची इच्छा असल्याचे नमूद केले आहे .
निर्भया पथक हे खरोखरीच अस्तित्वात आहे का?
विनयभंग व युवती अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता पोलीस प्रशासनाने स्थापन केलेले निर्भया पथक हे खरोखरीच अस्तित्वात आहे की केवळ कागदावरच आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .सावित्रीबाईंची जन्मभूमी असणाऱ्या तालुक्यात महिला व युवतींना सहाय्य करण्याच्या हेतूने नेमलेली महिला बालकल्याण अधिकारी हे पद सुद्धा कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे . महिला आयोग याप्रकरणी लक्ष घालणार का? प्रशासनाने असे प्रकार टाळण्यासाठी महिला व युवतींना भयमुक्त करण्यासाठी कठोरात कठोर पावले उचलण्याची गरज आहे )