पुणे : पोलीस दलात खळबळ उडवुन देणारी धक्कादायक घटना पुण्यातुन समोर आली आहे. वानवडी पोलिसांनी एका सराफी व्यावसायिकाला लुटलं असल्याची घटना उघडकीस आली आहे.संबंधित सराफी व्यावसायिकाने कोयता गँगकडून सोनं खरेदी केल्याचा आरोप लावून आरोपी पोलिसांनी व्यावसायिकाकडून तब्बल २५ तोळे सोने लंपास केले आहेत. या प्रकरणी चारही पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी याबाबत तक्रार दिली होती. हवालदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, शिपाई संदीप साळवे, सोमनाथ कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना प्रत्येक पाच हजारांचा दंड आकरला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
चारही कर्मचारी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. चारही जण काही दिवसांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात कर्नाटकातील बल्लारी येथे तपासासाठी गेले होते. यावेळी चोरट्यांनी चोरी केलेला माल बल्लारी येथील सराफा व्यावसायिकाला विकल्याची माहिती समोर आली होती. चोरट्यांनी पावतीसह माल विकला होता.चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती. सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिले असल्याची कबुली सराफी व्यावसायिकांन दिली.त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले. तुझ्याकडे आणखी १०० तोळे सोने असून, ते चोरांकडून घेतले आहे. तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे. ते चोरटे कोयता गँगमधील असून, त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला केला आहे,’ असे सराफा व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आले. तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या चार पोलिसांना २५ तोळे सोन्याचे दागिने दिले.