Pune News : पुणे : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे हातचलाखीने डेबीटकार्ड घेऊन एटीएम सेंटरमधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या विश्रांतवाडी पोलिसांनी आवळल्या आहेत.
मयंककुमार संतराम सोनकर (वय- २७ रा. द्वारका संकुल पार्टमेंट, परांडेनगर, धानोरी, पुणे, मुळ रा. मोहादा, जि. हमीपुर, उत्तर प्रदेश), कपिल राजाराम वर्मा (वय- ३० रा. परांडेनगर, धानोरी, पुणे मुळ गाव बडनी जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
८७ हजार ५८०रुपयांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विश्रांतवाडी चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेले बँकेचे डेबीट कार्ड चोरले. या डेबीटकार्डद्वारे आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून रोख रक्कम तसेच काही वस्तु खरेदी करुन फिर्य़ादी यांची ८७ हजार ५८०रुपयांची फसवणूक केली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार मोरे व खराडे यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी कस्तुरबा हाउसिंग सोसायटी कडे जाणाऱ्या रोडवरील सारस्वत बँकेच्या एटीएम जवळ येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपींची अंगझडती घेतली असता दोघांकडे वेगवेगळ्या बँकेची १६ डेबिट कार्ड व दाखल गुन्ह्यातील फिर्य़ादी यांच्या पत्नीचे डेबिट कार्ड तसेच ४५०० रुपये मिळाले. तर दुसरा आरोपी वर्मा याच्याकडे ९ डेबिट कार्ड मिळून आले. आरोपींकडे डेबिट कार्ड बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी डेबीट कार्ड आणि दुचाकी जप्त केली आहे.