लोणी काळभोर : तीन वर्षाच्या चिमुकलीवर घराशेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात मंगळवारी (ता.६) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
प्रशांत पडवळ (वय ४५, रा. वैष्णो सिटी, फेज २. उरुळी देवाची) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी आणि आरोपी प्रशांत पडवळ हे एकाच इमारतीत राहण्यास असून एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी यांनी एक तीन वर्षाची मुलगी आहे.
दरम्यान, फिर्यादी आणि तिचे पती दोघेही कामाला जात होते. त्यामुळे मुलीला कुठे ठेवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.त्यानंतर त्यांनी घरासमोरच राहणाऱ्या पडवळ कुटुंबाकडे या तीन वर्षीय मुलीला मंगळवारी (ता.६) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या दरम्यान ठेवले होते.
या कालावधीत आरोपीने चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार केले. संध्याकाळी जेव्हा फिर्यादी घरी आल्या आणि त्यांनी मुलीला घेतले. तेव्हा तिच्या गुप्तांगाला जखम असल्याचे निदर्शनास आले. व वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच हडपसर पोलिसांनी आरोपी प्रशांत पडवळ याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.