पुणे: राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेशासाठी राबवण्यात आलेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया ५ जून २०२५ रोजी पूर्ण झाली. पुणे विभागात एकूण २ लाख १९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी यामध्ये नोंदणी केली. मात्र याच विभागातील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी पुणे विभागात एकूण २ लाख ६३ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २ लाख ४९ हजार ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचा अर्थ असा की, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८८ टक्के विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, तर उर्वरित १२ टक्के विद्यार्थी अन्य शैक्षणिक पर्याय किंवा कोर्सकडे वळले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी मूळतः ३ जून २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र अल्पसंख्याक व इनहाउस कोट्यांमध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदत ५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. या वाढीव कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी पुढे आले आणि नोंदणी केली. पुणे विभागात तीन प्रमुख जिल्हे येतात पुणे, अहिल्यानगर, आणि सोलापूर. या विभागानुसार पुणे जिल्हात १,१९,८५३ विद्यार्थ्यांची नोंदणी, अहिल्यानगर जिल्ह्यात ५२,२३२ विद्यर्थ्यांची नोंदणी तर सोलापूर जिल्ह्यात ४७,०६९ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

दहावीनंतर अकरावी हा मुख्य पर्याय असला तरी अनेक विद्यार्थी आयटीआय, अभियांत्रिकी डिप्लोमा, व्होकेशनल कोर्सेस किंवा खासगी क्लासेस यासारख्या इतर शिक्षण शाखांकडे वळताना दिसतात. यामुळे जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या ट्रेंडकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवावी, असाही सल्ला दिला आहे.








